पुरातत्व विभाग: ताजमहालच्या धर्तीवर पुनर्विकास
दिल्ली – कुतुबमिनारच्या आवारात असलेल्या कुव्वत-उल-इस्लाम मशिदीचा जिर्णोद्धार ताजमहालच्या धर्तीवर केला जात आहे. प्रथमच कार्बनायझेशन तंत्राच्या मदतीने मशिदीच्या कमानीची दुरुस्ती केली जात आहे. त्याचे खराब झालेले दगड काढून त्या जागी नवीन दगड बसवले जात आहेत.
भूकंप आणि देखभालीअभावी निर्माण झालेले मशिदीतील तडे आता नव्याने भरले जात आहेत. त्यामध्ये लायटिंगचीही व्यवस्था केली जाणार आहे, ज्यामुळे ते दूरवरून लोकांना आकर्षित करेल. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणद्वारे त्याचे जतन केले जात आहे. ताजमहाल ज्या पद्धतीने कार्बनायझेशनच्या माध्यमातून जपला जात आहे, तीच शैली यामध्ये वापरली जात असल्याचे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर हे काम महिनाभरात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
सुलतान कुतुबुद्दीन ऐबकचे बांधकाम
ही मशीद सुलतान कुतुबुद्दीन ऐबक याने 1193 ते 1197 च्या दरम्यान बांधली होती. ही प्राचीन मशीद कुव्वत-उल-इस्लाम नावाने प्रसिद्ध आहे. यामध्ये वापरलेले खांब आणि इतर वस्तू हिंदू आणि जैन मंदिरे पाडून मिळवले गेल्याचे मानले जाते. त्यानंतरच्या राज्यकर्त्यांनीही या मशिदीचा विस्तार केला. 1211-36 मध्ये शमसुद्दीन इल्तुतमिश आणि 1296-1316 मध्ये अलाउद्दीन खिलजी यांनी मशिदीत काही भाग जोडले. ही मशीद हिंदू आणि इस्लामिक कलेच्या अंतर्गत बांधण्यात आली होती. मशिदीच्या आत एक लोखंडी खांब आहे, ज्यावर गुप्तकालीन लिपीत संस्कृतमध्ये एक शिलालेख लिहिलेला आहे.