नवी दिल्ली – जन्मल्यानंतर वयाच्या अवघ्या सहाव्या महिन्यांत जेव्हा स्नितीच्या पालकांना आपल्या मुलीच्या डोळ्याला कॅन्सर झाल्याचे कळले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना वाटले आता काय होईल? पण त्यांनी हार मानली नाही आणि स्नितीवर दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) पूर्ण उपचार केले आणि आज ती पूर्णपणे निरोगी झाली आहे. रोगमुक्त झाल्यानंतर ती इतरांना कॅन्सरशी लढा कसा द्यायचा, याविषयी जनजागृती करत आहे.
कॅन्सरवर मात करण्यात स्निती एकटी नाही, तिच्यासारखी शेकडो मुले आहेत जी इतरांसाठी एक उदाहरण आहेत. खरं तर, एम्सने ‘चाइल्डहुड कॅन्सर सर्व्हायव्हर्स डे’ निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये कर्करोगावर मात केलेल्या मुलांनी त्यांचे अनुभव सांगितले. यावेळी 12 वर्षीय स्नितीने सांगितले की, तिला वयाच्या 6 महिन्यांत रेटिनोब्लास्मा (डोळ्याचा कर्करोग) झाला होता. तिच्या आई-वडिलांनी स्नितीवर एम्समध्ये उपचार केले आणि आता ती ठणठणीत आहे. स्निती सांगते की, तिला आता पेंटींग्ज करायला आवडते. शिवाय ती ऑनलाइन माध्यमातून फ्रेंच शिकवत आहे.
दुसरीकडे, हापूर येथील रहिवासी असलेला अडीच वर्षांचा आरव त्याचे काका आनंद प्रकाश यांच्यासोबत रुग्णालयात आला होता. आनंदने सांगितले की, मूल 11 दिवसांचे असताना त्याला कॅन्सरची लक्षणे दिसू लागली. आधी मेरठमध्ये उपचार झाले आणि नंतर एम्स दिल्लीत आले, त्यानंतर येथील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया आणि औषधांच्या मदतीने मुलाला कर्करोगमुक्त केले.
एम्सचे संचालक डॉ. एम. श्रीनिवास आणि इतर डॉक्टरांनी कार्यक्रमात मुलांची भेट घेतली. त्यांचे अनुभवही सांगितले. यावेळी एम्सच्या बाल कर्करोगशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. रचना सेठ यांनी सांगितले की, एम्समध्ये उपचारासाठी येणारी कर्करोगाने ग्रस्त 80 टक्के बालके या गंभीर आजारावर मात करून निरोगी जीवन जगतात. लहान मुलांची काही लक्षणे पाहून कॅन्सर लवकर ओळखला तर तो बरा होऊ शकतो.
एम्सचा बालरोग ऑन्कोलॉजी विभाग हा कॅन्सर सर्व्हायव्हरशिप सेवा सुरू करणारा देशातील पहिला विभाग आहे. सामाजिक समस्या, कर्करोगाच्या उपचारांनंतरचे परिणाम, शिक्षण आणि समाजात एकात्मतेशी संबंधित आहे. कार्डियाक डिसफंक्शन, न्यूरोकॉग्निटिव्ह डेफिसिट, मेटाबॉलिक सिंड्रोम, मुलांमधील प्रजनन समस्या ओळखून त्यावर उपचार केले जातात.