नगर – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आदेश देऊनही उमेदवार चंद्रशेखर घुले यांचा झालेला पराभव राष्ट्रवादी कॉंग्रेसला चांगलीच जिव्हारी लागला असून पक्षातील गटबाजी या निमित्ताने आता चव्हाट्यावर आली आहे. या निवडणुकीत फुटलेल्या त्या संचालकांना तातडीने पक्षातून निलंबित करण्यात यावे, तसेच पक्षात गटबाजी करून सवतासुबा निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
कोळगे म्हणाले की, निवडीच्या आदल्या दिवशी अजित पवार व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बॅंकेच्या सर्व संचालकांची बैठक झाली. दोन ते तीन संचालकांनी पवार यांच्याबरोबर स्वतंत्र चर्चा केली होती. या बैठकीत जो उमेदवार दिला जाईल, त्याच्या बरोबर राहण्याचे आश्वासन सर्व संचालकांनी दिले होते. त्यावेळी इच्छुक कोण आहे, हे देखील विचारण्यात आले होते. पण कोणीच काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे निवडीपूर्वी सकाळी 10 वाजता पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी देखील बॅंकेच्या संचालकांना पुन्हा विचारणा केली. पण कोणी काही बोलले नाही.
मात्र बॅंकेच्या सभागृहात मतदान करतांना पाच जण फुटले. त्यामुळे घुलेंचा पराभव झाला.पराभव करून पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याचा अपमान करण्यात आला आहे. घुले कुटुंबीय नेहमीच पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिले आहे. यापूर्वीही अध्यक्षपदाची संधी घुले यांना आली होती. पण सीताराम गायकर यांचे नाव पक्षाने दिल्यानंतर घुले यांनी पक्षाचा आदेश पाळला. मात्र 8 तारखेला फुटीर संचालकांनी पक्षाचा आदेश पाळला नाही. आता जर या फुटीरांवर कारवाई झाली नाही तर पक्षात काही केले तरी पक्ष काहीच वाकडे करीत नाही, असा समज होईल. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी तातडीने फुटीर संचालकांना पक्षातून निलंबित करावे.
सध्या या फुटीर संचालकांच्या विरोधात आंदोलन करून निषेध नोंदविण्यात येत आहे. अकोले, श्रीरामपूर, कर्जत व श्रीगोंदा या तालुक्यात आंदोलन करून पुटीर संचालकांना जाब विचारला जात असल्याचे कपिल पवार म्हणाले. पक्षात गटबाजी करण्याचा प्रयत्न जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके करीत आहेत. स्वतःचा सवतासुबा करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. बॅंकेच्या 2021 मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतही त्यांनी पक्षाचा उमेदवार पराभूत केला होता. सोसायटीची 45 मते होती. त्यापैकी 9 मते फुटली. त्यावेळी पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे अशांचे फावले असून आता पक्षाने फाळके यांची पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी पवार यांनी केली.
निवडीत सरकारचा हस्तक्षेप
जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत राज्य सरकारने हस्तक्षेप केला आहे. जे संचालक फुटले त्याच्या व्यक्तीगत अडचणी असतील. त्याचा फायदा सरकारने घेतला. मात्र त्यामुळे पक्षाला आता या फुटीरांनी वेठीस धरणे योग्य नाही, असे पवार म्हणाले.
दोन दिवसांत फुटिरांची नावे जाहीर होणार
जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जे संचालक फुटले आहेत. त्याबाबत गोपनीय अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून येत्या दोन दिवसात तो अहवाल पक्षश्रेष्ठींकडे अंकुश काकडे पाठविणार असून त्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. चंद्रशेखर घुले यांनी सर्व संचालकांशी संपर्क करून प्रत्यक्ष भेट देखील घेतली होती. जिल्हा बॅंक व जिल्हा परिषद हे दोन मुद्दे वेगळे आहेत.