मुंबई – “रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा. आदिल शाही आणि मुघल बाजूला काढून श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असे उपरोधिक ट्वीट राष्ट्रवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाडांनी आज केले.
शनिवारी, आव्हाड यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून राज्यभरात गदारोळ सुरू असतानाच त्यांनी आपली भूमिका ठाम असल्याचे सांगितले आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी आज पुन्हा ट्वीट करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
“इतिहासातून मुलघांचा इतिहास काढून टाकणार,’असे विनोद तावडे यांनी म्हटले होते. त्याला उत्तर देताना, मग छत्रपती शिवाजी महाराज काय गोट्या खेळले असे दाखवणार का? असे वादग्रस्त वक्तव्य आव्हाडांनी आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा या कार्यक्रमात केले होते. त्यानंतर समस्त शिवप्रेमींनी आणि भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर आगपाखड केली. परंतु, आव्हाडांनी आपले शब्द मागे घेतले नसून मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले आहे.
निलेश राणेंची चपराक –
जितेंद्र आव्हाड, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीही बोलणार असाल तर ते सहन केले जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा, मुंब्रातून निवडून येण्यासाठी तुम्ही हिंदू धर्म विकला आहे हे आम्हाला माहीत आहे, मुघलांचा पुळका असेल तर पाकिस्तानला चालते व्हा, असे ट्वीट भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केले आहे.