बेल्हे(प्रतिनिधी) –मातृत्वाला काळीमा फासणाऱ्या महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिने आपल्या पोटच्या मुलीला फेकून दिलेल्या कालव्यात पोलिसांकडून शोध सुरू आहे. आळे, राजुरी, रानमळा, बेल्हा, अळकुटी, पारनेर भागातील कालव्यात किंवा पाण्याच्या चारीमध्ये कुणाला हिरव्या रंगाचे टी-शर्ट घातलेले आणि पिवळसर रंगाच्या शालीमध्ये गुंडाळलेले अर्भक आढळून आल्यास आळेफाटा पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आईने आपल्या पोटच्या बाळाला पिंपळगाव जोगा कालव्यात फेकून दिले. या घटनेने आळेफाटा परिसरात एकच खळबळ उडाली होती. कालव्याला पाणी सुरू असताना ते अर्भक पाण्यात फेकले होते. महिलेने कबुली दिल्यानंतर कालव्याचे पाणी कमी करून ते शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून युद्ध पातळीवर केला जात आहे.
आळेफाटा येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय सुनिता प्रजापती हिने शुक्रवारी (दि. 3) 15 दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली; मात्र महिलेकडून मिळालेली माहिती आणि तिच्या वागणे पोलिसांना संशयास्पद वाटू लागले.
Maharashtra : मराठा आरक्षणासाठी एकजुटीने लढा देऊ – मुख्यमंत्री शिंदे
पोलिसांनी “सीसीटीव्ही’ फुटेज तपासले आणि तक्रारदार आईला शनिवारी ताब्यात घेतले होते. वंशाला हवा होता आणखी एका दिवा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथकासमोर महिलेने कबुली दिली. रविवारी सकाळी आरोपी महिलेला प्रथमवर्ग न्यायालयात जुन्नर येथे हजर केले. असता न्यायालयाने महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक रागिणी कराळे तपास करीत आहेत.
वंशाला दिवा हवा म्हणून…
“वंशाला अजून एक दिवा हवा’ म्हणून पाचव्या अपत्याला जन्म दिला; पण पुन्हा मुलगीच झाल्याने जन्मदात्या आईनेच नवजात मुलीला पिंपळगाव कालव्यात फेकल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. या धक्कादायक प्रकरणामध्ये पोलिसांनी संबंधित 30 वर्षीय परप्रांतीय महिलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.