वाई -वाई तालुक्याच्या पश्चिम भाग हा करोनाचा केंद्रबिंदू असला तरीही वाई तालुक्यात सर्व भागात करोनाचे रुग्ण सापडल्याने संसर्ग झालेल्यांची संख्या 47 वर पोहचली आहे. शेवटचे टोक असलेल्या दुर्गम जांभळी, आसरे, दह्याट, वासोळे, ओहाळी, वेरुळी, धावडी, डुईचीवाडी व शहरात एक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे शहरासह संपूर्ण तालुका डेंजर झोनमध्ये गेला आहे. वाई नगरपालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था केलेल्या ठिकाणासह ग्रामीण रुग्णालय सॅनिटराईझ केले असून निवास परिसर कंटेनमेन्ट झोन सील केला असल्याची माहिती वाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी दिली.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत तालुक्यात एकही रुग्ण सापडला नसल्याने वाईकरांनी हुश्श करून निःश्वास सोडला असला तरीही सावध राहून काळजी घेण्याच गरज आहे. सध्या वाई शहरात खरेदीसाठी होत असलेली गर्दी करोनाला निमंत्रण देत असल्याचे चित्र आहे, करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कत आलेल्या लोकांची हाय रिस्कमधील स्त्राव तपासणीसाठी पाठविले आहेत.
सध्या वाईच्या किसन वीर मधील मुलींचे वसतीगृह रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरात आहेत. तर मुलांचे वसतिगृह विलगीकरण कक्ष बनविला आहे. तोही प्रमाणापेक्षा जास्त भरलेला आहे. त्याठिकाणी काहींना क्वारंटाइन केले आहे. अनेकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. अनलॉक 1 मध्ये वाई शहरात नागरिकांची गर्दी खूप वाढली असून ही चिंतेची बाब आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमावलीचे कडक पालन न केल्यास करोनाचा संसर्ग वाढण्यास मदत मिळणार आहे.