वाघोलीत वाहतूक कोंडीतून सुटका

तुंबलेला पाण्याचा लोंढा ड्रेनेजमधून बाहेर : लोकप्रतिनिधी, पोलीस, ग्रामपंचायतीचे प्रयत्न

वाघोली – पुणे -नगर महामार्गावर उबाळेनगर येथे दोन ठिकाणी साचणारे पावसाचे पाणी ड्रेनेज लाईनद्वारे काढण्यात यश आले. मंगळवारी रात्रीपासून पावसाचे पाणी महामार्गावर थांबत नसल्याने वाहतूक सुरुळीत झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तुंबलेल्या ड्रेनेज लाईनमधील दगड, कचरा काढून पाण्याला वाट करून दिली आहे. सध्या पावसाचे पाणी महामार्गावर येत नसले तरी पुढील काळात महसूल, पीएमआरडीएने दोन्ही ठिकाणी नैसर्गिक प्रवाह खुले करून देण्याची आवश्‍यकता आहे.

पावसाळा सुरु झाल्यापासून पुणे – नगर महामार्गावर उबाळेनगर येथे टाटा शोरूम व टोयोटा शोरूमसमोर पावसाचे पाणी साचून वाहतूक विस्कळीत होते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वाहतूक कोंडीमुळे नाराजी व्यक्‍त केली होती. पीएमआरडीए, महसूल प्रशासन, बांधकाम विभागाकडून कारवाईसाठी एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरू होता.

वाघोली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी व पोलीस प्रशासनच फक्‍त पाणी काढून देण्यासाठी दिवस- रात्र काम करीत होते. जेसीबीच्याने वाट करून देणे, तुंबलेले पाणी पंप लावून बाहेर काढणे, वाहनांना वाट दाखविणे आदी काम केली जात होती. तात्पुरत्या स्वरूपात काम केले तरी मुसळधार पाऊस आल्यानंतर महामार्ग पुन्हा पाण्याखाली जात होता. बांधकाम विभागाचा प्रयत्न अल्पजीवी ठरला.

दोन दिवसांत माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, सरपंच वसुंधरा उबाळे, सदस्य शिवदास उबाळे, जिल्हा वाहतूकचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप येळे, पोलीस उपनिरीक्षक आण्णासाहेब टापरे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी महामार्गाच्या कडेला ड्रेनेजलाईनच्या चेंबरचा शोध घेतला. तालेरा गोडाऊनसमोर कावडे वस्ती व साई सत्यम परिसरासाठी ड्रेनेज लाईनच्या दोन चेंबरचा शोध घेऊन उघडले. एका चेंबरमध्ये दगड व कचरा अडकल्याने कर्मचाऱ्यांनी अडथळा दूर केला. यानंतर पाण्याचा मोठा प्रवाह ड्रेनेज लाईनमधून पुढे गेला. ग्रामपंचायतीमार्फत चेंबरची उंची वाढविणे, सफाईचे काम सुरू आहे. नैसर्गिक प्रवाहाला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दाभाडेंचा विकासकामांचा अनुभव कामी आला
महामार्गावर उबाळेनगर परिसरात दोन्ही ठिकाणी तुंबणारे पाणी काढून देण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस व बांधकाम विभाग झटत होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामदास दाभाडे यांनी ड्रेनेजलाईनमधून पाणी काढण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी बुजलेल्या चेंबरचा शोध घेतला. त्यानंतर साठलेला पाण्याचा लोंढा पुढे सरकला. त्यांचा अनुभव कामाला आल्याचे पोलीस व कर्मचाऱ्यांनी मान्य केले.

वाघोलीत पावसाच्या पाण्याला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण धारकांची पाहणी करण्यात आली असून अहवाल हवेली तहसीलदार यांच्या कडे पुढील कार्यवाही साठी पाठवण्यात येत आहे
– किशोर शिंगोटे, मंडलाधिकारी, वाघोली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.