विद्यार्थ्यांनी केले महावितरणच्या कार्यालयात आंदोलन
पिंपरी – भोसरी येथील आदर्श शिक्षण संस्थेमध्ये गेल्या आठ दिवसांपासून वीज नसल्यामुळे शाळेची कामे खोळंबली आहे. महावितरणकडे याबाबत वारंवार तक्रार करुनही दखल न घेतल्याने अखेर विद्यार्थ्यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केले.
शिक्षण घेण्याच्या वयात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांवर देखील आंदोलन करण्याची वेळ आली आहे.् महावितरणचा धिक्कार असो, अशा घोषणा विद्यार्थ्यांनी महावितरण कार्यालयात दिल्या. शाळेने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या आठ दिवसांपासून आदर्श शिक्षण संस्थेमध्ये वीज नाही. वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. संपूर्ण शाळेमध्ये दुर्गंधी पसरल्याने याचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना होत आहे. पावसाचे दिवस असल्याने आरोग्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत शाळेच्या व्यवस्थापनाने महावितरणकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, याची दखल घेतली गेली नाही. याप्रसंगी नगरसेविका प्रियंका बारसे आणि शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.