मानवी जिनोमचे गूढ उलगडणारे मूलभूत संशोधन

पुणे विद्यापीठातील संशोधकांना यश : जगातील पहिले संशोधन

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर संशोधन संस्थांमधील संशोधकांच्या गटाने मानवी जिनोमच्या त्रीमितीय रचनेमध्ये कार्यरत असणाऱ्या महत्त्वाच्या अशा “स्कॅफोल्ड्‌ – मॅट्रीक्‍स अटॅचमेंट रिजन्सचा’ (स्मार) संपूर्ण आराखडा तयार करण्यात यश मिळवले आहे. त्याचबरोबर मानवी जिनोमशी, एड्‌स, कर्करोग यासारख्या गंभीर व्याधींना कारणीभूत ठरणाऱ्या “रेट्रोव्हायरस’ कुळातील विषाणूच्या संसर्गाचा असलेला नेमका संबंध शोधून काढण्याची कामगिरीही केली आहे. अशा प्रकारचा संबंध जगात पहिल्यांदाच शोधण्यात आला आहे.

पुणे विद्यापीठाच्या जैवमाहितीशास्त्र विभागातील डॉ. अभिजीत कुलकर्णी, जैवतंत्रज्ञान विभागातील डॉ. स्मृती मित्तल, राष्ट्रीय कोषिका विज्ञान केंद्रातील (एनसीसीएस) डॉ. समित चट्टोपाध्याय यांच्यासह विद्यार्थी संशोधक नितीन नरवडे, सोनल पटेल व आफताब आलम यांच्या गटाने हे संशोधन केले आहे. याबाबतचा संशोधन प्रबंध अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या “न्युक्‍लिक ऍसिडस्‌ रीसर्च जर्नल’मध्ये जून 2019च्या अंकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन समुदायाचीही अधिमान्यता मिळाली आहे.

नेमके संशोधन काय?
हे संशोधन गेल्या चार वर्षांपासून सुरू होते. त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात संशोधकांनी “बायोलॉजिकल डेटा मायनींग’ करत म्हणजेच उपलब्ध असलेल्या नोंदी मिळवून उपयोग करून संपूर्ण मानवी जिनोममधील महत्त्वाचा घटक असलेल्या “स्मार’चा आराखडा तयार केला.

संशोधनाचा उपयोग काय?
हे संशोधन एड्‌ससारख्या विषाणूजन्य आजारावरील तसेच, विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांवरील उपचार शोधण्यासाठी उपयुक्‍त ठरेल. मानवी जिनोमची कार्यपद्धती समजून घेण्यासाठीही त्याचा उपयोग होणार आहे. भविष्यात जीवशास्त्रामधील अनेक क्‍लिष्ट प्रश्‍न सोडविण्यासाठी जैवमाहितीशास्त्र उपयुक्‍त ठरत आहे व ते पुढेही अधिक उपयुक्‍त ठरेल, अशी माहिती संशोधक डॉ. अभिजित कुलकर्णी यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.