नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ झाली आहे. आज त्याला पारनेर न्यायालयात प्रथम वर्ग दंडाधिकारी उमा बोराडे यांच्या समोर हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे रस्त्यावरील पारनेर तालुक्याच्या हद्दीतील जातेगाव घाटात दोघा जणांनी गळा चिरून हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी यातील पाच संशयित आरोपींना जेरबंद होते. मात्र, या घटने मागील मुख्यसूत्रधार बाळ बोठे हा तब्बल 102 दिवस पोलिसांना चकवा देत होता. मात्र, पोलिसांनी हैदराबाद येथील बिलाल नगर परिसरातून मोठ्या शिताफीने बोठेला अटक करून पारनेर न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयाने 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली दिली होती.
या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी (दि.20) रोजी संपली असता त्याला पारनेर न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायधीश उमा बोराडे यांच्या समोर हजर केले. आरोपी बोठेकडे हत्येसंदर्भार्त अजूनही काही चौकशी करावयाची असून या कटात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असल्याने आरोपी बोठे याला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली.
तर आरोपीतर्फे वकिलांनी सांगितले की, हत्येबाबत आरोपी सागर भिंगारदिवे याने सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. आरोपी बाळ बोठे याने पोलिसांना तपासात सहकार्य केले असून बोठेच्या घराची झाडाझडती देखील घेण्यात आली आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्या नंतर त्याला मंगळवार (दि.23) पर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावली आहे.