शिवलिंगावर फुलांची आकर्षक सजावट श्रावण सरी कोसळल्या
वाल्हे – हरणी (ता. पुरंदर) येथील पांडवकालीन असलेल्या महादेव मंदिरातील हरणेश्वराला शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्ताने पहाटे मंदिराचे पुजारी यांनी शिवलिंगास अभिषेक करून विधिवत पूजा केली. तसेच शिवलिंगास फुलाची आकर्षण सजावट करण्यात
आली होती.
मागील दोन वर्षे करोना काळात निर्बंधामुळे मंदिर आणि उत्सवावर बंदी होती. यंदा सर्वच सण आणि उत्सव निर्बंधमुक्त साजरे होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातवरण होते. आज श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार असल्याने अनेक जण शेवटच्या सोमवारी उपवास करतात. महादेवाला अभिषेक करण्यासाठी श्रावणाचा शेवटचा सोमवार असल्याने अनेक भाविक पहाटेपासूनच हरणी येथील महादेव मंदिर दर्शनास येत होते.मध्यरात्री हरणी येथील ग्रामस्थांच्या वतीने शिवलिंगास महाभिषेक करून महापूजा करण्यात आली.
मध्यरात्रीपासूनच शिवलिंगास अभिषेक करण्यासाठी भाविकांची लगबग सुरू होती. टेकडीवरती वसलेल्या या मंदिराभोवती हिरवळ तसेच तुरळक श्रावण सरींनी वातावरण प्रसन्न झाले होते. भाविकांनी पहाटेपासुनच दर्शनासाठी रांगेत उभे राहुन दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांच्या रांगामधून “हर-हर महादेव’ चा जयघोष सुरू होता. नवस फेडणाऱ्यांनी गुळ-पेढे, नारळाचे वाटप केले.