प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 -राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचा विभाग असलेल्या नोंदणी व मुद्रांक विभागाला आता हक्काची इमारत मिळणार आहे. विधानभवनासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीच्या शेजारील जागेत राज्याचे “नोंदणी व मुद्रांक भवन’ उभारले जाणार आहे. नोंदणी व मुद्रांक भवनाची इमारत आठ मजली असून, 5 हजार 100 चौरस मीटर इतके बांधकाम आहे. ही इमारत पर्यावरणपूरक असून, 18 महिन्यांत बांधकाम पूर्ण होणार आहे. शुक्रवारी (दि. 2) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे.
नोंदणी व मुद्रांक विभाग हा शासनाचा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाकडे जमा होणाऱ्या महसुलावरून राज्याच्या विकास कामांना निधी मिळतो. मागील आर्थिक वर्षात नोंदणी विभागाने सुमारे 35 हजार कोटींचा महसूल शासनाला जमा करून दिला होता. मागील अनेक वर्षांपासून नोंदणी भवन साकारण्याचे प्रयत्न सुरु होते. मागील दोन वर्षांत या विषयाला अधिक गती मिळाली आणि नोंदणी भवनसाठी नवीन प्रशासकीय इमारती शेजारील जागा देण्यास शासनाने मान्यता दिली.
नोंदणी महानिरीक्षक यांचे कार्यालय सुरुवातीपासून पुण्यामध्ये कार्यरत आहे. 1991 पर्यंत शासकीय मध्यवर्ती इमारतीमधील बरॅकमध्ये, 1997 पर्यंत गव्हर्नमेंट फोटो रजिस्ट्री इमारतीत व त्यानंतर आजतागायत नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये हे कार्यालय कार्यरत आहे. इतर अधिकाऱ्यांची सुद्धा कार्यालये नवीन प्रशासकीय इमारतीमधील तळमजल्यावर आहेत. जागा अपुरी असलेल्याने काही कार्यालये ही दुसऱ्या इमारतीमध्ये आहेत. आता नोंदणी विभागाला हक्काची इमारत मिळणार आहे. इमारतीमध्ये नोंदणी महानिरीक्षक यांच्या कार्यालयाबरोबरच विभागाची इतरही कार्यालये असणार आहेत. एकूण 135 अधिकारी व कर्मचारी यांची बैठक व्यवस्था होणार आहे.
इमारत ही पर्यावरणपूरक असणार असून, सभागृह, संगणक लॅब, ग्रंथालय, अभ्यागत कक्ष, उपहारगृह, अपंगांकरिता रॅम्प आदी सुविधा असतील. या नवीन वास्तूमुळे कार्यालयाची कार्यक्षमता वाढणार आहे.