नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करण्याची इम्रान खान यांची मागणी फेटाळून लावली आहे. देण्यात येणाऱ्या आर्थिक पॅकेजला मंजूरी देण्यापूर्वी गेल्या महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमधील गैरप्रकारांचा फेरआढावा घेण्यात यावा, अशी मागणी इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे केली होती.
जर एखाद्या देशाला अशा पर्स्थितीत नवीन कर्ज दिले जात असेल, तर त्या कर्जाची परतफेड कोण करणार? त्यापेक्षा नाणेनिधीने नवीन कर्ज देण्यापूर्वी निवडणूक निकालांचा आढावा घ्यावा, अशी मागणी करणारे पत्र इम्रान खान यांनी नाणेनिधीला पाठवले होते.
मात्र ही मागणी नाणेनिधीने फेटाळून लावल्यामुळे पीटीआय पक्षाला आणखीन एक धक्का बसला आहे.आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणामध्ये हस्तक्षेप करू इच्छित नाही. नाणेनिधीचा संबंध अर्थिक विषयांशी आहे, राजकारणाशी नाही, असे उत्तर नाणेनिधीने इम्रान खान यांना पाठवले आहे.
उलट पाकिस्तानशी नवीन कर्जाबाबत वाटाघाटी करण्याची तयारीही नाणेनिधीने दर्शवली आहे. त्याचबरोबर नाणेनिधीने निवडणुकांमधील सर्व मतभेदांबाबत शांततामय मार्गांनी तोडगा काढण्याचे आवाहन पाक सरकारला केले आहे.