नवी दिल्ली – भारताच्या महिला हॉकी संघाची स्टार खेळाडू रीना खोखर डोळ्यांच्या दुखापतीतून पूर्ण बरी झाली आहे. आता माझे लक्ष्य राष्ट्रीय संघाकडून अव्वल कामगिरी करुन देशाला ऑलिम्पिक मिळवून देण्याचे आहे, असा निग्रह रीनाने व्यक्त केला आहे.
रीनाला डोळ्यांची दुखापत झाली होती. त्यावर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे ती जवळपास 2 वर्षे हॉकीपासून लांब होती. 2018 साली झालेल्या आशियाइ स्पर्धेत भारतीय संघाने रजतपदक मिळविले होते त्या संघात रीनाचा सहभाग होता व तिने अव्वल कामगिरीही केली होती. आता ती पूर्ण बरी झालेली असून पुढील वर्षी जपानमध्ये होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज बनली आहे.
2017 साली रीनाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. तिने आपल्या कामगिरीत सातत्य राखल्याने तिचे संघातील स्थान देखील पक्के झाले होते. मात्र, त्याचवेळी तिच्या डोळ्यांना दुखापत झाली व तिला संघातून बाहेर राहावे लागले. व्यायाम करताना रीनाचाच हात तिच्या डोळ्यांना लागला व त्यामुळे तिच्या दृष्टीवर परिणाम झाला होता. आता शस्त्रक्रियेनंतर मात्र तिचा दृष्टिदोष दूर झाला असून ती आता संघातील पुनरागमनाकडे डोळे लावून बसली आहे.