मांडवगण फराटा -शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट देऊन वैद्यकीय अधिकारी, नर्सेस यांच्याशी चर्चा केली व आरोग्य विषयक परिस्थितीची माहिती घेत अडी-अडचणी समजून घेतल्या.
घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, सरपंच अण्णा कदम यांच्याशी वार्तालाप करून गावातील परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य शासन व प्रशासनाकडून सर्व आवश्यक उपाय योजना केल्या जात असून स्थानिक पातळीवर नागरिकांना काही समस्या असल्यास त्या माझ्यापर्यंत पोहोचवाव्यात, मी स्वतः लक्ष घालून सहकार्य करेन अशी ग्वाही त्यांनी दिली.
आढळराव पाटील यांच्या वतीने अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या करोना योद्ध्यांना सॅनिटायझर्स, फेस मास्क यांसह प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्याधुनिक इन्फ्रारेड टेम्परेचर मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली कटके, जिल्हा समन्वयक रविंद्र करंजखेले, उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, सुनील बाणखेले, तालुकाप्रमुख सुधीर फराटे, विरेंद्र शेलार, माजी युवासेना अधिकारी संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.