अतिरिक्त आयुक्तांचे सर्व विभागांना आदेश
पुणे – महापालिकेच्या मुख्य इमारतीसह, क्षेत्रीय कार्यालय आणि परिमंडळ कार्यालयात होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर महापालिकेत राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते, ठेकेदार तसेच दैनंदिन कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणियरित्या वाढली आहे.
शहरात लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात होताच, महापालिकेतही ठेकेदार, राजकीय कार्यकर्ते तसेच नागरिकांची वर्दळ वाढली आहे. गेल्या काही दिवसात ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली असून पालिकेतच सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला जात आहे.
त्यातच, महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्येही मोठ्या प्रमाणात नव्याने रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर, महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही पालिकेत गर्दी नियंत्रित करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती.
अखेर त्याची दखल घेत अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सर्व विभागांना आदेश देत, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश सर्व विभागांना दिले आहेत.