वाघळवाडी, -सोमेश्वर कारखान्याचे फायनान्स मॅनेजर बी. एन. कदम यांना नियमबाह्य दिलेली मुदतवाढ रद्द करून आर्थिक वसुली करण्याचे आदेश साखर संचालक उत्तम इंदलकर यांनी दिले आहेत.
सभासद विकास मधुकर धुमाळ यांना साखर आयुक्त आयुक्तांकडे धाव घेतली होती. त्यांनी (दि.20) जानेवारीला पत्रव्यवहार केला होता. राज्य साखर संचालक यांनी (दि.13) फेब्रुवारी रोजी सोमेश्वरला पत्र पाठवून निवृत्त फायनान्स मॅनेजर कदम यांना दिलेली नियमबाह्य मुदतवाढ रद्द करून त्यांच्याकडून आर्थिक वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. साखर संचालकांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, फायनान्स मॅनेजर कदम यांना निवृत्त झाल्यानंतर एक वर्षाची मुदतवाढ देऊन इतर कारखान्यापेक्षा जास्त वेतन दिले आहे.अधिकारी अथवा कर्मचारी निवृत्त झाल्यास त्याला पुन्हा मुदतवाढ देण्याची आवश्यकता नाही. योग्य कारवाई करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते.
सभासद जाधव यांनी याच विषयावर (दि.29) एप्रिलला साखर आयुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. यावर (दि.11) रोजी साखर संचालक इंदलकर यांनी कारखान्याला पुन्हा आदेश दिले आहेत. साखर संचालक यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, कुठलीही आवश्यकता नसताना वर्षानुवर्षे काही अतांत्रिक अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा घाट घातला जात आहे. लाखो रुपयांची उधळपट्टी निवृत्त अधिकाऱ्यांच्या वेतनावर केली जात असून ही बाब गंभीर आहे.