पिंपरी – बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तसेच प्रवासाची हिस्ट्री असलेल्या व क्वारंटाईन केलेल्या 1 हजार नागरिकांपैकी 55 जणांनी क्वारंटाईनच्या नियमांची पायमल्ली केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष बाब म्हणजे यातील काहीजण परराज्यातही निघून गेल्याचे समोर आल्याने क्वारंटाईन तोडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
सध्या शहरात करोनाने धुमाकूळ घातला आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले व करोनाची चाचणी निगेटिव्ह आलेल्या सुमारे एक हजाराहून अधिक नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या नागरिकांना कोविड प्रतिबंध नियमांचे पालन करणे बंधनकारक असून, त्यांना 14 दिवस घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र यातील 55 जणांनी होम क्वारंटाईच्या नियमांची पायमल्ली करत क्वारंटाईन “ब्रेक’ केल्याची माहिती महापालिका प्रशासनाला मिळाली आहे. याची खातरजमा केल्यानंतर यातील काही जणांनी थेट परराज्यातील आपले घर गाठले आहे, तर काहीजणांनी विनाकारण घराबाहेर फेरफटका मारला आहे.
तर काहीजण भाजीमंडई, किराणा अथवा आजूबाजूला फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या 55 जणांची माहिती महापालिका प्रशासनाने एकत्र केली असून, ती पोलिसांना सादर केली जाणार आहे. त्यानंतर कायद्यातील तरतुदी तसेच कलम 188 नुसार या नागरिकांवर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त म्हणाले. जे नागरिक परराज्यात गेले आहेत त्या नागरिकांच्याही मूळगावची माहिती संकलीत केली असून, संबंधित राज्यातील पोलीस प्रशासनाची संपर्क साधून त्यांच्यामार्फत क्वारंटाईन ब्रेक करून परराज्यात जाणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त म्हणाले.
बाहेरून आलेल्यांची माहिती कळवा – आयुक्त
लॉकडाऊन तीनमध्ये प्रवासाला परवानगी दिली जात आहे. बाहेरून शहरात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद केली जात आहे; परंतु काहीजण छुप्या पद्धतीने शहरात येत आहेत. शहरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला होम क्वारंटाईन केले जाणार आहे. आपल्या शेजारी, सोसायटीत अथवा माहितीमध्ये बाहेरून कोणी आले असल्यास त्याची माहिती नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने महापालिकेला कळवावी, असे आवाहन महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे.