वाघोली – वाघोली तालुका हवेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ३० खाटांचे ग्रामीण रूग्णालयात ” एक विशेष बाब” म्हणून श्रेणीवर्धन करण्यास मान्यता राज्याच्या आरोग्य विभागाने मान्यता दिली असल्याची माहिती भाजप नेते संदीप सातव यांनी दिली आहे.
वाघोली तालुका हवेली येथे कार्यरत असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील दररोज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, भाजप नेते आमदार राहुल कुल, प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनानुसार लेखी निवेदनाद्वारे संदीप सातव यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यास यश आले असून प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली, (ता. हवेली, जि. पुणे)चे ३० खाटांचे ग्रामीण रूग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाने सादर केला होता.
प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली, (ता. वाघोली, जि. पुणे) चे ३० खाटांचे ग्रामीण रूग्णलयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास “एक विशेष बाब ” म्हणून दि. २१ जून च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली असून सदर ३० खाटांचे ग्रामीण रूग्णालयाकरीता विहीत पध्दतीने जागा उपलब्ध करुन तेथे बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते संदीप सातव यांनी दिली आहे. वाघोली आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी राज्य शासनाने ट्रामा सेंटरला मान्यता दिली आहे.
या कामी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी पाठपुरावा केला आहे. त्याच पद्धतीने वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालय म्हणून विशेष बाब म्हणून मान्यता मिळवण्यासाठी भाजप नेते संदीप सातव यांनी पाठपुरावा केला आहे.