खंडाळा – खंडाळा तालुक्यातील नागरिकांसाठी खंडाळा येथे असलेले ग्रामीण रुग्णालय हे सध्या डॉक्टर नसल्याने सलाईनवर आहे. दि. 27 रोजी पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याने ग्रामीण रुग्णालयात नेलेल्या रुग्णाला डॉक्टरच हजर नसल्याने उपचार मिळू शकले नाहीत. तर कर्मचाऱ्याने देखील रुग्णाच्या नातेवाईकांशी उध्दट वागणे केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी संबंधित कर्मचारी व हजर नसलेल्या डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पारगाव खंडाळा हे तालुकास्तरीय ठिकाण असून येथून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने अपघाताच्या घटना वारंवार घडत असतात. मात्र, रात्री अपरात्री काही झाले तर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित नसतात तसेच कर्मचाऱ्यांकडून येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे वर्तन केले जाते. अशावेळी सर्वसामान्यांनी जायचे कोठे अशी नागरिकांची हालत आहे. दि. 27 रोजी पहाटे गावातीलच एका वृद्ध रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावर संबंधित रुग्णाचे नातलग ग्रामीण रुग्णालयात गेले असता तेथील कर्मचाऱ्यांकडून डॉक्टर अनुपस्थित असल्याचे सांगितले. तसेच डॉक्टर येईपर्यंत बाहेर उभे रहा असे सुनावत नातेवाईकांशी उद्धट वर्तन केल्याचा प्रकार घडला. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मग कर्मचाऱ्याची चांगलीच झाडाझडती घेत त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली तसेच या प्रकारचा व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केल्यानंतर कर्मचाऱ्याची भाषा मवाळ झाली.
मात्र, या प्रकारात रुग्ण वृध्द महिलेचा दुर्देवाने मृत्यूही झाला. या घटनेमुळे नातेवाईकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या असून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी. वास्तविक मागील वर्षी एशियन पेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून खंडाळा रुग्णालयास जवळपास 70 ते 80 लाखांची सुसज्ज यंत्रसामग्री आयसीयू केंद्रासाठी दिली गेली आहे. मात्र फक्त डॉक्टरांअभावी ही पूर्ण यंत्रसामग्री धूळ खात पडून आहे. या प्रकाराला जबाबदार कोण ? ग्रामीण भागातील रुग्ण सेवा अशी वाऱ्यावर असेल तर मग हे ग्रामीण रुग्णालय बंद तरी करा, अशी संतप्त मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.
रुग्णालय बंद करुन टाका
रात्री अपरात्री एखाद्या रुग्णावर उपचार होत नाहीत. ही अवस्था असेल तर यापेक्षा दुर्दैव काय असणार आहे. या असल्या असुविधांमुळे सामान्य लोकांना इमर्जन्सीमध्ये पेशंटला इच्छा नसतानाही खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचाराला न्यावे लागते आणि अमाप पैसा खर्च करावा लागतो. वेळेला जर उपचार भेटत नसतील तर ग्रामीण रुग्णालय बंद करुन टाका. आरोग्य सेवा देत असल्याचे मोठया जाहिराती सरकार करते मात्र, ग्रामीण रुग्णालयातील वास्तवही शासनाने पहावे.
सचिन गाढवे, खंडाळा
डॉक्टर, कर्मचाऱ्यावर कारवाई करा
तालुकास्तरीय रुग्णालय असल्याने 24 तास डॉक्टरांची उपलब्धता गरजेची आहे. सर्वसामान्य रुग्णांना रात्री अपरात्री जर रुग्णालयाची गरज भासली तर त्यांनी काय करायचे? संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी. अद्यावत यंत्रणा केवळ डॉक्टर्स, कर्मचारी नसल्याने धूळ खात पडलेली असेल तर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे हे अपयश आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकारात गंभीरपणे लक्ष घातले पाहिजे.
योगेश संकपाळ, नगरसेवक