चंदीगड :- उत्तर प्रदेशात 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर त्या राज्यात राजपूत आणि गुर्जर समुदाय परस्परांसमोर उभे ठाकले होते. त्याचे कारण होते ते 9 व्या शतकातील सम्राट मिहीर भोज यांची जात कोणती?
आता पुन्हा सम्राट मिहीर भोज यांच्या जातीवरून हरियाणात भारतीय जनता पार्टीच्याच दोन गटांत वाद सुरू झाला असून एका समुदायाच्या नेत्यांनी राजीनामा देण्याचे हत्यार उपसले आहे.
गुरूवारी हरियाणातील कैथल येथे राजा मिहीर भोज यांच्या एका प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी राजाच्या नावाच्या शेवटी गुर्जर हा शब्द जोडण्यात आला. गुर्जर प्रतिहार सम्राट मिहीर भोज असा उल्लेख प्रतिमेवर आहे व त्यावरून वादाची ठिणगी पडली आहे.
गुर्जर ऐवजी हिंदू सम्राट असा उल्लेख करणे योग्य ठरेल असे भाजपमधील राजपूत नेत्यांचे म्हणणे आहे. यासाठी या लोकांनी निदर्शनेही केली आणि त्यावेळी आमच्यावर लाठीमार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. अश्रुधुराचा वापरही पोलिसांनी केला आणि लाठीमारत तीन जण जखमी झाल्याचा त्यांचा दावा आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या राजपूत नेत्यांनी मग भाजप नेत्यांच्या प्रतिमेचे दहन केले.
आता स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार भाजपचे कैथल येथील किसान मोर्चाचे अध्यक्ष राजीव राणा, मंडल अध्यक्ष महिपाल राणा, निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. संदीप राणा यांच्यासह 35 जणांनी राजीनामास्त्र उगारले आहे. कैथलचे भाजप अध्यक्ष अशोक गुर्जर यांना तातडीने पदावरून हटवले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, गुर्जर शब्द हटवल्या जाण्याच्या मागणीबाबत कैथलचे भाजप आमदार लिलाराम गुर्जर म्हणाले की सम्राट मिहीर भोज हे गुर्जर होते व त्याचे ठोस पुरावे उपलब्ध आहेत. इराक, इराण, अफगाणिस्तान आणि ब्रह्मदेश हे भारताचा भाग होते तेंव्हा सम्राट मिहीर भोज यांनी भारतावर राज्य केले. हा इतिहास आहे व राजपूत समुदायाचे लोक त्यात आता बदल करू शकत नाहीत. राजपूत आमचे बांधव आहेत आणि काही प्रतिक्रिया देताना त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.
दरम्यान, आपली बाजू मांडताना भाजपचे राजपूत समुदायाचे नेते महिपाल राणा म्हणाले की,आम्ही सम्राट मिहीर भोज यांच्या नावापुढे हिंदू सम्राट असे लिहिले जावे अशी मागणी केली आहे. राजपूत सम्राट लिहा असे आमचे म्हणणे नाही. त्या प्रतिमेवरून जोपर्यंत गुर्जर शब्द हटवला जात नाही तोपर्यंत आमची निदर्शने सुरूच राहतील.