सातारा – जिल्ह्यातील रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यांना वाचा फोडण्यासाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ यांच्यावतीने शुक्रवारी दि.१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेशन दुकानदारांना धान्य वितरणात कराव्या लागणाऱ्या तांत्रिक कसरती, त्यातून मिळणारे तुपपुंजे उत्पादन यामुळे रेशन दुकानदार अडचणीत आले आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी सांगितले. यासंदर्भातील त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की सातारा जिल्ह्यामध्ये हजारो रेशन दुकानदार आहेत. सर्वत्र महागाईचा उच्चांक झाला असताना रेशन दुकानदार मात्र तुटपुंज्या कमिशनवर कुटुंबाची गुजराण करताना मेटाकुटीला आला आहे. रेशन धान्य प्रणालीमध्ये पॉस मशीनची अडचण, सर्व्हर समस्या, पारंपरिक प्रशासकीय तांत्रिक अडचणी यामुळे दुकानदाराला जिणे नकोसे झाले आहे. दुकानदारी करताना अनंत अडचणी येत आहेत.
यापूर्वी शासनाने केरोसिन व्यवसाय संपुष्टात आणल्यानंतर पंचावन्न हजार कुटुंबे रस्त्यावर आली होती. त्याची कसली दखल शासनाने घेतली नाही. मात्र, ही वेळ आता रेशन दुकानदारांवर येऊ नये याकरता हा आंदोलनाचा मार्ग निवडला जात असल्याचे श्रीकांत शेटे यांनी सांगितले.
धरणे आंदोलनानंतर राज्य संघटनेच्यावतीने रेशन दुकानदारांच्या अडचणींचे, मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांना देण्यात येणार आहे. 1 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता सातारा जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांनी धरणे आंदोलनासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.