सातारा- सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही सातारा शहरातील अनेक दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत नाहीत, त्या इंग्रजी अक्षरांमध्ये आहेत यासंदर्भात तातडीने निर्णय व्हावा अन्यथा व्यापक आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी दिला आहे. येथील सहाय्यक कामगार आयुक्तांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी शहर उपाध्यक्ष भरत रावळ, वैभव वेळापुरे, संदीप जोंधळे, प्रशांत सोडमिसे, गणेश पवार आदी उपस्थित होते. निवेदनात नमूद आहे की मराठी आपली अस्मिता असून मराठीत मोठ्या अक्षरात पाट्या असाव्यात असे बंधनकारक आहे. असे असताना काही दुकानांवर अजूनही इंग्रजी पाट्या आहेत. हा प्रकार मराठी अस्मितेवर घाला घालणारा आहे, संबंधित दुकाने आणि आस्थापनांच्या मालकांकडून योग्य अंमलबजावणी होत नाही.
काही दुकानदारांच्या इंग्रजीमधील पाट्यांची यादी आयुक्तांना यावेळी सादर करण्यात आली. मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी योग्य त्या ठिकाणी दाद मागू तसेच या संदर्भात एक व्यापक जनआंदोलनं उभे करू, असा इशारा राहुल पवार यांनी दिला. या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यावतीने देण्यात आले आहे