नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट : गाळेधारकांचा महापालिका प्रशासनावर अन्यायकारक भाडेवाढीचा आरोप
नगर – शहरातील महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलांमध्ये असलेल्या गाळेधारकांवर महापालिका प्रशासनाने अन्यायकारक भाडेवाढ लादली असून त्याची सक्तीने वसुली सुरू करण्यात आल्याने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गाळेधारकांच्या प्रश्नासंदर्भात तोडगा निघेपर्यंत गाळेधारकांवर कारवाई न करण्याचे निर्देश ना. शिंदे यांनी दिले आहेत. दरम्यान, तरीही प्रशासनाने कारवाई केल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरात महापालिकेत सुमारे 850 पेक्षा जास्त गाळेधारक असून महापालिकेने या गाळेधारकांचे गाळे भाडे तब्बल पाच ते सहा पट वाढविले आहे. शासनाच्या आदेशानुसार ही दरवाढ करण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. मात्र, महापालिका प्रशासन शासनाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून दिशाभूल करत आहे.
गाळेधारकांवर अन्यायकारक दरवाढ लागू करून त्याची सक्तीने वसुली करत असून, गाळेधारकांना याबाबत नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे गाळेधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रश्नासंदर्भात अनेकदा आंदोलनही केली आहेत. मात्र, प्रशासन गाळेधारकांचे कुठलेही म्हणणे ऐकून घेत नाही. त्यामुळे या गाळेधारकांवर व त्यांच्या कुटुंबियांवर कारवाईमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. तरी या प्रश्नी लक्ष घालून तोडगाव काढावा अशी मागणी ना. शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवेदन देवून केली आहे.
याबाबत आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात लवकरच बैठक आयोजित करून या प्रश्नी तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन मंत्री शिंदे यांनी दिले असल्याची माहिती उपनेते राठोड यांनी दिली. दरम्यान, गोरगरीबांची अतिक्रमणे काढली जातात परंतु, बड्यांची अतिक्रमणे का काढली जात नाहीत असा सवाल उपस्थित केला. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अमोल येवले, मदन आढाव यांच्यासह गाळेधारक उपस्थित होते.