पुणे – महापालिकेकडून सोमवारपासून शहरात रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या आठवड्यात दिवसाला 500 टेस्ट करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. यात हडपसर-मुंढवा, ढोलेपाटील रस्ता, शिवाजीनगर-घोले रस्ता, बिबवेवाडी आणि येरवडा-कळस-धानोरी या क्षेत्रीय कार्यालयांच्या टेस्टिंग सेंटरवर प्रत्येकी 100 जणांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेकडून पालिकेने 1 लाख रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट किट खरेदी केल्या आहेत. त्याची वैधता तपासण्यासाठी पालिकेने 28 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या केल्या होत्या. त्यात या चाचण्यांची वैधता अपेक्षेनुसार आल्याने या चाचण्या सुरू केल्या जाणार आहेत.
टप्प्याटप्प्याने या चाचण्यांची संख्या सर्व कोव्हिड सेंटरवर वाढविण्यात येणार आहे. तर या चाचण्यांचा अहवाल अर्धा तासातच येत असल्याने चाचणीनंतर संबंधित व्यक्तीचा अहवाल येईपर्यंत त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करावे लागत होते. आता अहवाल निगेटिव्ह येताच घरी सोडता येणार आहे.
यामुळे करोना वेटिंग सेंटर आणि विलगीकरण केंद्रावर येणारा ताण कमी होणार आहे. या चाचण्यांची नोंदणी, अहवालाची नोंदणी तसेच, माहितीचे संकलन तसेच आवश्यक बाबींचे प्रशिक्षण महापालिकेने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना रविवारी दिले आहे.