शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेतर्फे श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री साई आश्रम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरात स्वतः संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डोंगरे यांनी रक्तदान करुन आपला सहभाग नोंदवीला. याप्रसंगी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, दिलीप उगले, उपअभियंता रघुनाथ आहेर आदी उपस्थित होते. तसेच या शिबिरात संस्थानचे मुख्य लेखाधिकारी घोरपडे, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांच्यासह शिर्डीतील नागरिक व संस्थानच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना संस्थानच्या वतीने प्रमाणपत्र व ब्लड डोनर कार्ड देण्यात आले.
सदर शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय नरोडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. आज पहाटे साडेचार वाजता काकड आरती झाली. पहाटे पाच वाजता श्री साईसच्चरित या ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. या निमित्ताने श्री साईबाबांच्या प्रतिमेची व पोथीची व्दारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पुजारी उदय वाळुंजकर यांनी वीणा, दिलीप सुलाखे यांनी पोथी, तर विलास जोशी व चंद्रकांत गोरकर यांनी श्रींची प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते.
पहाटे 5.20 वाजता श्रींचे मंगलस्नान झाले. सकाळी सहा वाजता श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त पुजारी दिलीप सुलाखे यांनी सपत्नीक श्रींची पाद्यपुजा केली. सकाळी अकरा वाजता लेंडीबागेत पुजारी बाळासाहेब जोशी यांच्या हस्ते श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधिवत पूजन करुन ध्वज बदलण्यात आला. दुपारी साडेबारा वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. दुपारी चार ते सहा यावेळेत कीर्तन झाले. सायंकाळी सात वाजता श्रींची धुपारती झाली. उद्या (दि.6) उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे साडेचार वाजता श्रींची काकड आरती होईल. पहाटे पावणेसहा वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी सात वाजता श्रींची पाद्यपुजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून, सकाळी दहा वाजता गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12.10 वाजता श्रींची माध्यान्ह आरती होणार असून, सायंकाळी सात वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ 10.30 वाजता श्रींची शेजारती होईल.