पिरंगुट – येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयात शारदा पतंग महोत्सव उत्साहात संपन्न झाला. महोत्सवाचे उद्घटन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे व मानद सचिव ऍड. संदीप कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या नवीन बोधचिन्हाचे औपचारिक अनावरण करण्यात आले.
एकमेकांच्या साथीने पतंगबाजीचा आनंद लुटण्याच्या संस्कृतीपासून आजची पिढी अनभिज्ञ आहे. ग्रामीण भागातील तरूण मुले आणि शालेय विद्यार्थीसुद्धा पबजी, क्लॅश ऑफ क्लोन, कॅंडीक्रश सारख्या गेम्सच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे ही लुप्त होत चाललेली सांस्कृतिक परंपरा पुनरूज्जीवित करण्यासाठी व ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे खजिनदार ऍड. मोहन देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव, प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी, उपप्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, डॉ. प्रवीण चोळके, माजी सरपंच बाळासाहेब गोळे, माजी जिल्हा परिषद गटनेते शांताराम इंगवले, माजी स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य शंकर पवळे, सामाजिक कार्यकर्ते आण्णासाहेब नवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शांताराम इंगवले म्हणाले, इलक्ट्रिक माध्यमामुळे तरूणांचा बराचसा वेळ वाया जात आहे. त्यांचा वेळ सत्कारणी लावण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी असे महाविद्यालयीन उपक्रम राबवणे गरजेचे आहेत. त्यामुळे हा अतिशय स्तुत्य आणि वेगळा उपक्रम आहे. प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी म्हणाल्या, पर्यावरण आणि संस्कृती जतन करण्यासाठी तसेच सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक पारंपारिक खेळाचा पर्याय म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक डॉ. विजय घाडगे व डॉ. आनंद महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक यांनी परिश्रम घेतले. महोत्सवाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत देशमुख व प्रा. मिनाली चव्हाण यांनी केले. तसेच डॉ. प्रविण चोळके यांनी आभार मानले.
सांस्कृतिक खेळाला उत्तेजन देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होण्यासाठी याचे आयोजन केले आहे. हल्ली तरूणांमध्ये तणाव आणि हाडांचे त्रास उद्भवत आहेत. त्यामुळे अनेक विकार होऊ शकतात. यासाठी पतंगबाजीसारखे मैदानी खेळ खेळणे गरजेचे आहे.
-ऍड. संदीप कदम, मानद सचिव पुणे जिल्हा शिक्षण मंडळ