झोन-4च्या हद्दीत वसुलीबंद भागीदारी जोरात
पाणी बॉटल पुरवणाऱ्यांकडूनही वाटा मागण्याची मजल
– संजय कडू
पुणे – झोन-4 मधील येरवडा पोलीस स्टेशन मागील काही दिवसांपासून विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे. येथील एका वादग्रस्त कर्मचाऱ्याला मुख्यालयाचा रस्ता दाखवण्यात आला. तर, तपास पथकाची धुरा नुकतीच महिलांच्या हाती देण्यात आली. यामुळे पोलीस ठाण्यांच्या पातळीवरील गैरप्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
शहरातील 31 पोलीस ठाण्यांपैकी सर्वाधिक बेकायदा व्यवसाय झोन-4 मध्ये चोरी छुपे आहेत. याला स्थानिक पोलीस ठाण्यातील तपास पथकातील काही कर्मचारी आश्रय देत आहेत. या कर्मचाऱ्यांचे धाडस इतके वाढले आहे, की आता वसुलीपर्यंत मर्यादित न रहाता थेट अवैध धंदेवाल्यांबरोबर “पार्टनरशिप’ करण्यापर्यंत मजल गेली आहे. स्पा सेंटर, दारू व्यवसाय, जुगार व्यावसायिकांची काही कर्मचाऱ्यांची “पार्टनरशिप’ असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यांच्या पातळीवरील गैरकारभार लक्षात घेऊन गुन्हे शाखेमार्फत अवैध धंद्यांवर कारवाई करत आहेत. मोक्का, तडिपारी, प्रतिबंधात्मक कारवाईद्वारे सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात आला आहे. अवैध धंदे बहुतांश प्रमाणात बंद असल्याने पोलीस ठाण्याच्या पातळीवरील तपास पथके आणि त्यांच्या वसुलीवाल्यांची पंचाईत झाली आहे. मात्र, या सर्वांतून झोन-4 मधील येरवडा, विमानतळ, विश्रांतवाडी आणि चंदननगर पोलीस ठाण्यांमधील महाभागांनी मार्ग काढला आहे. वसुलीवर मर्यादा येत असल्याने थेट अवैध धंद्यांमध्येच “पार्टनरशिप’चा फंडा अजमावला जात आहे. अवैध धंद्यांना चोरी-छुपे संरक्षण देण्याच्या नावाखाली थेट कमाईत वाटा घेतला जात आहे.
पोलीस ठाण्याकडून कारवाई होणार असेल, तर त्याची टीप रितसर पोहचवली जाते. कधी कारवाई झालीच, तर हस्तक्षेप करत प्रकरण मिटवण्यात मध्यस्थी केली जाते. इतकेच नव्हे, तर मॉल तसेच कॉर्पोरेट कार्यालयांना पाण्याचे जार पुरवणाऱ्यांकडूनही धंद्यात वाटा मागितला जात आहे. वाटा दिला नाही, तर त्यांच्या गाड्या अडवल्या जातात, त्रास दिला जातो. मॉलच्या बाहेर पदपथावर बेकायदेशीर पार्किंगसाठीही मॉल व्यवस्थापनाकडून पैसे उकळले जात आहेत.
येरवडा ठाण्यातील त्रिदेवांचे गुडघ्याला बाशिंग
वसुली मामाची तडकाफडकी बदली केल्यावर त्याची जागा घेण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यातील तिघा कर्मचाऱ्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. वसुलीचे काम आपल्याला मिळावे, यासाठी त्यांची वरिष्ठांपुढे लुडबूड सुरू झाली आहे. मात्र, पोलीस आयुक्तालयाच्या रडारवर पोलीस ठाणे असल्याने सध्या तरी वसुलीचा विषय बासनात गुंडाळला गेला आहे.
विमानतळमधील “वसुलीवाला’ जोरात
पोलीस आयुक्त कार्यालयाकडून येरवडा पोलीस ठाणे रडारवर आहे. यामुळे विमानतळ, चंदननगर, विश्रांतवाडी येथील तपास पथकांच्या करामती झाकल्या गेल्या आहेत. सध्या विमानतळ पोलीस ठाण्यातील वसुलीभाई जोरात आहे. त्याच्या तक्रारी आणि कामाबद्दल परिसरात जोरदार चर्चा आहे. अल्पावधीतच येरवड्यातील वसुली मामाची कीर्ती तो मिळवू शकतो, असे पोलीस कर्मचारीच बोलत आहेत.