वाघोली, (प्रतिनिधी)- माजी जिल्हा परिषद सदस्य तथा वाघोलीचे माजी सरपंच रामदास दाभाडे यांनी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वाघोली येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी कमळ हाती घेतले.
रामदास दाभाडे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. मधल्या काळात देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष असताना ते भाजपमध्ये गेले. मात्र त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेतले.
राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर ते ठोस कोणत्याही गटात नव्हते. आज त्यांनी पुन्हा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे वाघोली व परिसरामध्ये भाजप व महायुतीची ताकद वाढणार आहे. माजी उपसरपंच महेंद्र भाडळे, दत्तात्रय कटके, सुधीर भाडळे यांनीही प्रवेश केला.
या प्रसंगी माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, राहुल कुल, माजी आमदार योगेश टिळेकर, विक्रांत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव, शिरूर तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, हवेली तालुका अध्यक्ष श्याम गावडे आदी उपस्थित होते.