राम रहीम पुन्हा चर्चेत ; म्हटले, देवाच्या मनात असलं तर मी….

नवी दिल्ली : हरियाणामधील रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगामध्ये कैद असणाऱ्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्याने आपली आई आणि अनुयायांसाठी एक चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये राम रहीम याने लवकरच आपण तुरुंगाबाहेर येऊ अशी आशा व्यक्त केली आहे. सोमवारी डेराचे दुसरे गुरु सतनाम सिंह यांच्या १०२ व्या जन्मदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्संगाच्या कार्यक्रमामध्ये डेरा प्रमुख असणाऱ्या गुरमीत राम रहीम सिंहची चिठ्ठी वाचून दाखवण्यात आली.

“देवाची इच्छा असेल तर मी लवकरच तुरुंगाबाहेर पडेल. त्यानंतर मी आईवर उपचार करुन घेईल,” असे राम रहीमने चिठ्ठीत म्हटले आहे. जेव्हा मी माझ्या आईला भेटण्यासाठी रुग्णालयामध्ये गेलो होतो तेव्हा तिची प्रकृती चिंताजनक होती असेही राम रहीमने चिठ्ठीत नमूद केले आहे. आमची भेट झाल्यानंतर तिची प्रकृती थोड्याफार प्रमाणात सुधारली असेही राम रहीमने म्हटले आहे. यापूर्वीही राम रहीमने १३ मे २०२० रोजी आणि २८ जुलै रोजी आपल्या आईसाठी आणि अनुयायांसाठी चिठ्ठी लिहिली होती.

डेरा सच्चा सौदाने आयोजित केलेल्या सत्संगाच्या कार्यक्रमाला पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. डेरामध्ये जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या रस्त्यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेल्या. सत्संगच्या कार्यक्रमासाठी सोमवारी पहाटेपासूनच डेरा सच्चा सौदामध्ये अनुयायी येण्यास सुरुवात झाली होती. या सत्संगासाठी मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते. यावेळी राम रहीमचं रेकॉर्ड करण्यात आलेले प्रवचन ऐकवण्यात आले. नंतर आलेल्या सर्व अनुयायांना राम रहीमने पाठवलेली चिट्ठी वाचून दाखवण्यात आली.

२०२१ हे वर्ष आपल्या अनुयायांसाठी खूप सारा आनंद घेऊन येवो, अशी इच्छा या चिठ्ठीमधून राम रहीमने व्यक्त केलीय. तसेच सर्व अनुयायांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या इच्छा पूर्ण होवोत असंही राम रहीम म्हणाला आहे. देव सर्व संसारावर आणि देशावर त्याची कृपावृष्टी कायम ठेवोत असंही राम रहीमने चिठ्ठीत म्हटलं आहे. डेरा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही चिठ्ठी राम रहीमने २३ जानेवारी रोजी लिहिलेली आहे. दोन साध्वींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुरुमीत राम रहिमला २०१८ साली २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.