Ayodhya Ram Temple : भारताच्या इतिहासात 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. अनेक दशकांच्या संघर्ष, समर्पण आणि प्रतिक्षेनंतर भव्य राम मंदिराचा अभिषेक सोहळा होणार आहे. राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा एक दिव्य अनुभव असेल, जिथे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला मिळेल.
प्राचीन मंत्रोच्चार, भजन-कीर्तन, देवतांचा अभिषेक, मंदिर परिसरात दीपप्रज्वलन यामुळे संपूर्ण अयोध्या भक्तीमय होऊन जाणार आहे. या सोहळ्याआधी अयोध्येत सुरक्षेसाठी हायटेक व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अयोध्येची रेड आणि यलो झोनमध्ये विभागणी करण्यात आलीय.
दरम्यान, तुम्हाला देखील प्राण प्रतिष्ठेआधी किंवा 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये जायचे असल्यास काय कराव लागणार? याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत. राम मंदिरात प्रवेशासाठी काय सिस्टिम असेल? समजून घ्या…
प्राण प्रतिष्ठेआधी अयोध्येत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अयोध्येची रेड आणि यलो झोनमध्ये विभागणी करण्यात आलीय. यलो झोनमध्ये फक्त यूपी पोलिसांची तैनाती असेल. राम मंदिर परिसरातील काही भाग रेड झोनमध्ये असेल.
अयोध्येत प्रशासनाने अशी व्यवस्था केलीय की, विना परमिट बाहेरची कुठलीही गाडी अयोध्या नगरीत प्रवेश करु शकणार नाही. जागोजागी बॅरिकेड्स लावण्यात आले असून, पोलीस देखील तैनात असतील.
मंदिरात प्रवेशाआधी तीन लेयरची सुरक्षा व्यवस्था असेल. सध्या भाविक अस्थायी चेकिंग पॉइंटमधून जातात. यात मेटल डिटेक्टर आणि मॅन्युअल फ्रिस्किंगची व्यवस्था आहे. लवकरच एक डझनपेक्षा जास्त सिक्योरिटी चेकिंग केबिन तयार होणार आहेत.
यात अत्याधुनिक स्कॅनिंग मशीन, मेटल डिटेक्टर्स आणि फ़्रीस्किंग मंदिरात प्रवेशाआधी केलं जाईल. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मंदिराच्या आत कोणतही इलेक्ट्रॉनिक गॅजेट, लेदर प्रोडक्ट, बेल्ट तसेच मेटल प्रोडक्ट आतमध्ये घेऊन जायला प्रतिबंध असेल.