मुंबई : यंदाची राज्यसभा निवडणूक अत्यंत चर्चेचा विषय ठरली आहे. राजकरणातला हाय होल्टेज ड्रामा यादरम्यान पाहायला मिळाला. राज्यसभेच्या निकालावरून छत्रपती संभाजीराजेंच्या समर्थकांचे एक पोस्टर सध्या लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टर द्वारे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सरळ निशाणा साधण्यात आला आहे. ‘गनिमी कावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार’, असा मजकूर पोस्टरवर झळकत आहे.
नेमके काय आहे पोस्टर ?
मुंबईत शिवसेना भवनासमोर हे पोस्टर लावले असून या पोस्टरवर एका बाजूला छत्रपती शिवरायांचा फोटो दिसतो आहे तर त्याच्या खालच्या बाजूला छत्रपती संभाजीराजेंचा फोटो दिसतो आहे. शिवाय मजकूर लिहिला आहे की, आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे. छत्रपती शिवरायांचा… ! गनिमी कावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे जाहीर आभार, राज्यसभा तो झांकी है स्वराज्य में २०२४ अभी बाकी है जय शिवराय ” असा मजकूर या पोस्टर वर छापलेला दिसून येत आहे.
समर्थकांनी माझ्या प्रेमापोटी जे फ्लेक्स लावले, त्यांच्या प्रेमाचा मी आदरच करतो. मात्र कोणत्याही पक्षाला खुन्नस म्हणून त्यांच्या कार्यालयासमोर अशी काही कृती करणे, हे माझ्या तत्वात बसत नाही. राजकारणात येणार असलो तरी 'स्वराज्य'ला तत्वांची बैठक असेल.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 12, 2022
हे माझ्या तत्वात बसत नाही
या पोस्टरबाजीवरून छत्रपती संभाजी राजेंनी ट्विट करीत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ” समर्थकांनी माझ्या प्रेमापोटी जे फ्लेक्स लावले, त्यांच्या प्रेमाचा मी आदरच करतो. मात्र कोणत्याही पक्षाला खुन्नस म्हणून त्यांच्या कार्यालयासमोर अशी काही कृती करणे, हे माझ्या तत्वात बसत नाही. राजकारणात येणार असलो तरी ‘स्वराज्य’ला तत्वांची बैठक असेल. अशी प्रतिक्रिया त्यांनाही दिली आहे.
राज्यसभा निवडणुकांसाठी छत्रपती संभाजीराजे इच्छुक होते त्यासाठी त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती मात्र शिवसेनेने शिवबंधन बांधण्याची अट घातल्यामुळे हे प्रकरण तिथेच फिस्कटले. त्यानंतर शिवसेनेच्या संजय पवार यांचा राज्यसभा निवडणुकीत पराजय झाला. त्यातच आता मुंबईत संभाजीराजेंच्या समर्थकांनी केलेली पोस्टरबाजी चर्चेचा विषय ठरत आहे.