बेल्हे -राजुरी (ता. जुन्नर) येथे चार संशयित रुग्ण आढळून आल्याने तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी गाव बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायत कार्यलयात मंगळवार (दि.23) तातडीची बैठक घेऊन राजुरी गावठाण व 3 किलोमीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे गावातील बॅंक, पतसंस्था, सोसायटी, देशी दारू दुकान, ढाबे, हॉटेल, भाजीपाला, किराणा व इतर सर्व दुकाने पुढील आदेश होईपर्यंत बंद राहणार आहेत.
दवाखाने व मेडिकल ठरवून दिलेल्या वेळेत सुरू राहतील. गावातील किराणा, भाजीपाला, रेशन घरपोच सुविधा फक्त सुरू राहिल. गावातील कोणत्याही व्यक्तीने गावाबाहेर पडू नये, नवीन कोणी गावामध्ये येऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कोणी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.