मुंबई : राज्यासह देशाला भेडसावणाऱ्या करोनाला नियंत्रित करण्यासाठी लसीकरणाचा उपाय करण्यात येत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज यांनी करोना लस घेणार नसल्याचे धक्कादायक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याची आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीच दखल घेतली आहे. त्यामुळे ते स्वतः आता इंदुरीकर महाराज यांची भेट घेणार असून लसीबाबत त्यांचे प्रबोधन करणार आहेत.
इंदुरीकर महाराजांचे आज जालन्यात किर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्याआधी राजेश टोपे त्यांची भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी एका किर्तनादरम्यान करोना प्रतिबंधक लशीबाबत इंदुरीकर महाराज यांनी नकारात्मक विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता इंदुरीकर महाराज जालन्यामध्ये येणार आहेत. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे त्यांची भेट घेणार आहेत.
अधिकाधिक लोकांनी करोना लसीकरण करावे यासाठी त्यांनी आवाहन करावे यासाठीही राजेश टोपे आवाहन करणार आहेत. करोना लसीकरणात वाढ व्हावी यासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांनी आवाहन करावे असे आरोग्य मंत्र्यांनी म्हटले होते. त्यानंतर सलमान खानने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून लसीकरणासाठी आवाहन केले. मात्र, भाजपने या व्हिडिओवर आक्षेप घेतला होता.
विशिष्ट समाजाचे तुष्टीकरण सुरू असल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सलमान खान हे मोठे सेलिब्रेटी असून ते एका विशिष्ट समाजाचे नाहीत. सलमान खान हे मुस्लिम समाजातून येत असल्याने तुष्टीकरण होत असल्याचा आरोप करणे चुकीचे असल्याचे टोपे यांनी म्हटले.