Rajasthan Election Result 2023 : राजस्थानमध्ये मतमोजणी सुरू असून भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यात मोठी आघाडी घेतली आहे. राजस्थानमध्ये भाजप 113 तर काँग्रेस 70 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानमधील अनेक व्हीआयपी जागांवर लोकांची नजर आहे. यापैकी एक जागा जयपूरचा विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघ आहे. भाजपने या ठिकाणी खासदार दिया कुमारी यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने ज्येष्ठ नेते सीताराम अग्रवाल यांना तिकीट दिले आहे.
खासदार दिया कुमारी विद्याधर नगर विधानसभेतून ६६ हजार मतांनी पुढे असून विजयाकडे वाटचाल करत आहेत. दिया कुमारी यांनी मतमोजणीदरम्यान आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिया कुमारी म्हणाल्या की, मुख्यमंत्री कोण होणार हे संसदीय बोर्ड ठरवेल.
पुढे बोलताना दिया कुमारी म्हणाल्या, “राज्याचा विकासाला सरकारचे प्राधान्य असेल. आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आहे.” तसेच त्या म्हणाल्या,”गेहलोत सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. तसेच केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. कार्यकर्त्यांनी तळापासून वरपर्यंत मेहनत घेतली असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
दिया कुमारी पुढे बोलताना म्हणाल्या, “पक्ष जी काही जबाबदारी देईल, ती मी पूर्ण करेल. राजस्थानमधील 200 जागांपैकी 199 जागांवर 25 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. राजस्थानमध्ये 70 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. राजस्थानमध्ये मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. 2018 साली राजस्थानमध्ये काँग्रेसने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. 2018 मध्ये काँग्रेसला 99 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला 73 जागा मिळाल्या होत्या.