Madhya Pradesh, Rajasthan, Chhattisgarh Vidhan Sabha Election Results 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये भाजपने मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत असून तेलंगणामध्ये मात्र काँग्रेस प्रचंड बहुमताने विजयी होताना दिसत आहे.
अशात या निवडणुकीच्या निकालांवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,”
देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. सर्व राज्यांनी दाखवून दिले की, एकच हमी काम करते आणि ती म्हणजे पीएम मोदींची हमी. मोदींची हमी म्हणजे प्रत्येक हमीच्या पूर्ततेची हमी!
ते पुढे म्हणाले की, लोकांना दुहेरी इंजिनचे सरकार हवे आहे. काँग्रेसनं दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. काँग्रेसची सरकारे जनतेने नाकारली आहेत. आता ज्यांना सुट्टीमध्ये परदेशात जायचे आहे ते जाऊ शकतात, अशी त्यांनी उपरोधिकपणे राहुल गांधी यांच्यावर टीका केली. जातीपातीचे राजकारण केले तर एकच उत्तर मिळेल, हे जनतेने काँग्रेसला दाखवून दिले आहे, असेही ते म्हणाले.
मध्य प्रदेशात भाजप 169, काँग्रेस 69, बसपा एका जागेवर आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये भाजप 114, काँग्रेस 70, अपक्ष 7 आणि बसपा दोन जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणात काँग्रेस 64 जागांवर आघाडीवर आहे, बीआरएस 40 जागांवर, भाजप आठ जागांवर, एआयएमआयएम 6 आणि सीपीआय एका जागेवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमधील 90 जागांपैकी भाजप 54 आणि काँग्रेस 33 जागांवर आघाडीवर आहे.