पुणे – औषधाच्या नावाखाली गोव्यात विक्रीसाठी असलेल्या मद्याची वाहतूक करणारा ट्रक उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. यात तब्बल 52 लाख 42 हजारांचा मद्यसाठा जप्त करून एकाला अटक करण्यात आली.
कृष्णा तुळशीराम कांदे (30, रा. अंबील वडगाव, पोस्ट, पोथरा, जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. केवळ गोव्यात विक्री करण्यास परवानगी असलेल्या मद्याची वाहतूक एक ट्रक वारजे माळवाडी परिसरात शनिवारी (दि.6) वाहतूक करत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला (डी विभाग) मिळाली.
त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, पुणे अधीक्षक संतोष झगडे व बीडचे उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय डेरे, दुय्यम निरीक्षक गणेश केंद्रे, योगेंद्र लोळे, सागर धुर्वे, तसेच समीर पडवळ, महेश बनसोडे, राजू पोटे, अभिजित सीसोलेकर यांनी छापा टाकून ट्रक जप्त केला.
ट्रकमध्ये 10 लाख 44 हजाराच्या इंपिरिअर ब्ल्यू विस्कीच्या 145 बॉक्समध्ये 6,960 बाटल्या, मॅकडोवेल्सचे 19 लाख 58 हजार 400 रुपयांचे 255 बॉक्समध्ये 12 हजार 240 बाटल्या, एड्रियल क्लासिक व्हिस्की-2 लाख 40 हजारांच्या 600 बाटल्या असा 52 लाख 42 हजार 400 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.
पकडण्यात आलेला ट्रक बीडला जाणार होता. गाडीमध्ये सीलबंद माल हा औषधे असल्याचे बिल आरोपीकडे होते. गोव्यातील वेरणा ते राजस्थानमधील जोधपूर तसेच बिल त्याच्याकडे होते. पाठीमागे ट्रकला सील होते.
औषधे असल्याने ते सील कोणी तोडण्यास धजावत नाही. परंतु, आम्हाला मिळालेली माहिती खात्रीलायक असल्याने आम्ही संबंधित ट्रकवर छापा टाकला. यावेळी आम्हाला मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा सापडला.
– संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे