siddharth jadhav : 100 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या नाट्य संमेलनाला आतापर्यंत अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली. तर काही राजकीय मंडळींनीही उपस्थिती दर्शवली. पिंपरी-चिंचवड येथे सुरु असलेल्या या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेही गेले होते. मात्र, हा कार्यक्रम आटोपून राज ठाकरे पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरून मुंबईच्या दिशेने घरी जात होते. त्यावेळी खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसले.
ट्रॅफीकमुळे लोकांची गैरसोय होत असल्याचं पाहून राज ठाकरे गाडीतून उतरून स्वत: टोलनाक्यावर गेले आणि त्यांनी अडकलेल्या रुग्णवाहिकेला रस्ता करून दिला. यानंतर राज ठाकरे यांनी खास ठाकरी शैलीत टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्याला दम दिला. ‘पुन्हा बांबू लावला तर सगळ्यांच्या बांबू लावेन मी, एक जरी गाडी अडकली तरी याद राखा.
कुठपर्यंत ट्राफीक आहे ते माहिती आहे का? रुग्णवाहिका अडकली आहे रस्त्यात..’, असा इशारा राज ठाकरे यांनी टोल कर्मचाऱ्यांना दिला. आणि त्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. राज ठाकरेंच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, आता याबाबत मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवने भाष्य केलं आहे. सिद्धार्थचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सिद्धार्थने घडलेला प्रकार सांगत राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे. सिद्धार्थ म्हणतो, “राज ठाकरे यांच्याबरोबर नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही पुणे ते मुंबई असा प्रवास करत होतो. राज ठाकरे स्वत:गाडी चालवत होते आणि मी त्याच्यांच गाडीत बसलो होतो. खालापूर टोलनाक्याजवळ गाड्यांची लांब रांग लागली होती. त्यांच्या गाडीला रस्ता करून दिला होता.
View this post on Instagram
पण, साहेब थांबले आणि आम्हाला काही कळायच्या आत गाडीतून उतरले. त्यांनी टोलनाक्यावरील सर्व कर्मचाऱ्यांना राज ठाकरे स्टाइलमध्ये सर्व गाड्या सोडण्यास सांगितलं. 4-5 किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रुग्णवाहिकाही अडकली होती. लोक कंटाळले होते. पण, राज साहेबांनी सांगितल्यानंतर सगळ्या गाड्या सोडण्यात आल्या. पण, एवढंच करून ते थांबले नाहीत.
सगळ्या गाड्या जाईपर्यंत आणि रुग्णवाहिकेला वाट मिळेपर्यंत साहेब तिथेच होते. निघताना पण, साहेबांनी सांगितलं की एकही गाडी थांबली नाही पाहिजे. पुढे पण वाशी टोलनाका किंवा इतर ठिकाणीही जिथे रांगा लागल्या होत्या. तिथे त्यांनी खडसावून सांगतिलं. माझ्यासाठी हा विलक्षण अनुभव होता,” असं सिद्धार्थ व्हिडिओत म्हणाला.