Maharashtra Lok Sabha Election| लोकसभा निवडणूक जाहीर होताच महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री अमित शाह यांची राज ठाकरे यांनी दिल्लीत भेट घेतली. यानंतर देवेंद्र फडणवीस मुंबईत आल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा राज ठाकरे यांची भेट घेतल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर आज वांद्रे येथील हॉटेल ताज लँडस् एँडस येथे ही बैठक झाली आहे. या बैठकीत राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही हे स्पष्ट होईल. यानंतर आता महायुतीत चौथा भिडू येण्याची शक्यता आहे.
मनसेला मुंबईतील दक्षिण मुंबईची जागा दिली जाण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीचं महत्त्व वाढलेलं आहे. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळी शिवसेना विजयी झाली होती. या मतदारसंघावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून मिलिंद देवरा यांना तयारी करण्यास सांगितले होते.. आता हा मतदारसंघ राज ठाकरेंच्या मनसेकडे जाणार असल्यास शिंदेंची सहमती आवश्यक आहे.
कोणत्या जागांसाठी मनसे करणार मागणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर महायुतीत सहभागी झाली तर मनसेला दक्षिण मुंबई आणि शिर्डी या ठिकाणी जागा दिली जाईल अशी चर्चा आहे. या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जाते आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात झालेली चर्चाही गुलदस्त्यातच आहे.आज राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरु असताना महायुतीतील महत्त्वाचे नेते अजित पवार मात्र उपस्थित नाहीत.
आजची बैठक महत्त्वाची
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महायुतीसाठी आजची बैठक महत्त्वाची आहे. मनसेला मुंबईतील दक्षिण मुंबई आणि शिर्डी जागा मिळणार का याबाबत चर्चा सुरु होती. दक्षिण मुंबई आणि शिर्डीच्या जागेवर शिवसेनेचे खासदार गेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. यापैकी नेमकी कोणती जागा मनसेला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याद्वारे आता मनसेकडून उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले जाऊ शकते.