पुणे – नाताळामुळे शहरातील कॅम्प, लक्ष्मी रोड, कोरेगाव पार्क, फर्गसन रस्ता या परिसरात तरुणांचा जल्लोष सुरू आहे. शहरात उत्साहाचे वातावरण असताना संध्याकाळी अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची धांदल उडाली. काहीवेळ झालेल्या पावसामुळे उत्साहात व्यत्यत आला.
राज्यात मागील चार दिवसांपासून हवामानात लक्षणीय बदल झाले आहेत. त्यामुळे पुणे शहरासह मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. बुधवारी (दि. 25) नाताळाचा दिवस असल्यामुळे मंगळवारी मध्यरात्रीपासून शहरातील महत्त्वाच्या भागात तरुणांनी सांताक्लॉजची टोपी, कपडे घालून शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे.
आज दिवसभर ढगाळ वातावरणामुळे कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी शक्यता होती. संध्याकाळी सातवाजेपर्यंत आकाश मोकळे होते. मात्र, साधारण आठच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या पावसामुळे त्यांची तारांबळ उडाली असून, काही मिनिटच पाऊस झाला. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरात हलक्या सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.