सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर पंतप्रधान भडकले

हक्क आणि जबाबदाऱ्या नेहमी एकमेकांबरोबर असतात

लखनौ नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोधासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाच्यावेळी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जोरदार टीका केली. हक्क आणि जबाबदाऱ्या नेहमी एकमेकांबरोबरच असतात, हे आंदोलनकर्त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, असेही सुनावले.

“तुम्ही जे केले, ते योग्य होते असे तुम्हाला वाटते का ?’ असा सवालही पंतप्रधानांनी विचारला. जाळपोळीमध्ये जे नष्ट झाले, ते तुमच्या मुलाच्या उपयोगाचे नव्हते का? या जाळपोळीमध्ये आणि हिंसाचारामध्ये जे पोलीस आणि सामान्य नागरिक जखमी झाले त्यांचे काय झाले असेल ? असा प्रश्‍नही मोदींनी विचारला.

“हक्क आणि जबाबदाऱ्या नेहमी एकमेकांच्या साथीनेच येतात.’ हे हिंसाचार माजवणाऱ्यांनी विसरू नये, अशा शब्दात मोदींनी आपला संताप व्यक्‍त केला. लोकभवन येथे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान बोलत होते.

अटल बिहारी वाजपेयी मेडिकल युनिव्हर्सिटीची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आली. जम्मू काश्‍मीरमध्ये लागू असलेले 370 कलम म्हणजे एक जूना रोग होता. तो बरा करणे खूप अवघड असल्याचे वाटत होते. मात्र अशा अवघड आव्हानांना कसे हाताळायचे हीच तर आमची कसोटी होती, असे मोदी म्हणाले आणि शांतपणे तोडगा काढला गेला असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

यासंदर्भातील सर्वांच्या धारणा मोडीत काढल्या गेल्या. रामजन्मभूमीच्या प्रश्‍नावरही शांतपणे तोडगा काढला गेला आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांनी आपल्या लेकींच्या रक्षणासाठी भारतात आश्रय घेतला होता. त्यांच्या समस्येवरही सर्व देशवासियांच्यावतीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे तोडगा शोधला गेला. या आत्मविश्‍वासाने देश नव्या युगाला सामोरा जात आहे.

अजून जे काही शिल्लक असेल, ते सर्व केले जाईल. सर्व भारतीय मिळून प्रश्‍नावर उत्तर शोधत आहेत, असे ते म्हणाले. आव्हान कितीही मोठे असली, तरी त्या आव्हानालाही आव्हान देण्याचा आमचा स्वभाव आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.