पुणे – मध्य महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाऱ्याच्या चक्रिय स्थितीमुळे पुण्यासह संपूर्ण राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आगामी चार दिवसांत राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मध्य महाराष्ट्रात असलेली वाऱ्याची चक्रिय स्थिती आणि उत्तर कर्नाटक ते मध्य प्रदेशाचा आग्नेय भाग व महाराष्ट्र या भागात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता अधिक वाढली आहे. कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रिय स्थिती या दोन्हीच्या प्रभावामुळे वातावरणात सातत्याने बदल होत आहे.
शहर परिसरात शुक्रवारी (दि.19) आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. शहरात गुरुवारी (दि.18) 36.9 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान, तर 17.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.