- पोलिसांनी तीन लाखांहून अधिक रोकड हस्तगत
- सुमारे 41 लाख रुपयांचे टोकन क्वाइन केले जप्त
- साठ व्यापाऱ्यांसह 72 जणांवर कारवाई
लोणावळा – लोणावळ्यातील कुमार रिसॉर्ट या नामांकित हॉटेलात रंगलेल्या “हायप्रोफाइल’ जुगारावर लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनित कॉंवत यांच्या पथकाने रविवारी (दि. 6) रात्री धाड टाकली. या कारवाईमध्ये एकूण 72 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडील 3 लाख 20 हजार 830 रुपये रोख रक्कम व खेळासाठी वापरण्यात आलेले एक हजार व पाचशे रुपये किंमतीचे तब्बल 40 लाख 75 हजार रुपये किंमतीचे टोकन कॉईन पोलिसांनी जप्त केले आहे. ताब्यात घेण्यात आलेले सर्वजण गुजरात राज्यातील व्यापारी असून, खास जुगार खेळण्यासाठी लोणावळ्यात आले होते.
या कारवाईत गुजरात येथील 60 व्यापाऱ्यांसह सर्व्हिस प्रोव्हाईड करणाऱ्या 12 महिला तसेच कुमार रिसॉर्टचे मालक धिरजलाल कुमार ऐलानी, कुमार रिसॉर्टच्या व्यवस्थापक अन्वर शेख (दोघेही राहणार मुंबई), आणि या जुगाराचे नियोजन करणारा झिशान इरफान ईलेक्ट्रिकवाला (वय 34, रा. जोगेश्वर वेस्ट मुंबई) यांच्यावर पोलीस शिपाई विकास कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवी कलम 188, 269 यासह दारुबंदी कायदा कलम 86 (1), जुगार प्रतिबंध अधिनियम 4 व 5 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोणावळा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कुमार रिसॉर्टमध्ये दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येऊन जुगार खेळत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांना मिळाली. त्यानंतर रविवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कॉंवत यांच्यासह लोणावळा शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, पल्लवी वाघोले, अश्विनी लोखंडे, विकास कदम, शंकर धनगर, सागर धनवे, ईश्वर काळे, सतिष कुदळे यांच्या पथकाने छापा टाकला.
कुमार रिसॉर्टमध्ये “गेमझोन बिल्डिंग’मध्ये दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये सहा टेबल लावत जुगार सुरू होती. पोलिसांनी धाड टाकत खेळात वापरलेली 3 लाख 20 हजार 830 रुपयांची रोकड, 6 हजार 343 रुपयांची दारू, खेळासाठी वापरण्यात येणारे 1000 रुपये किंमतीचे 36 लाख 60 हजार रुपयांचे टोकन व 500 रुपये किंमतीचे 4 लाख 75 हजार रुपयांचे टोकन जप्त केले आहेत.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनीत कॉंवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी हे तपास करीत आहेत.