लंडन – भारतातील बॅंकांना अब्जावधी रूपयांचा चुना लावून फरारी झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्यावरील प्रत्यार्पणाच्या खटल्याची सुनावणी आजपासून लंडनच्या कोर्टात सुरू झाली. ती पाच दिवस चालणार आहे.
नीरव मोदी सध्ये लंडनच्या कारागृहात आहे. आज तो व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे कोर्टाच्या सुनावणीला हजर राहिला. वेस्टमिनीस्टर मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात हा खटला सुरू आहे. यावेळी भारताच्या ईडी आणि सीबीआयचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
नीरवला भारताच्या हवाली करण्याच्या संबंधात भारत सरकारतर्फे जादाचे पुरावे कोर्टापुढे सादर करण्यात आले आहेत.ब्रिटीश सरकारने भारताच्या त्याला भारतात हद्दपार करण्याच्या विनंतीला मंजुरी दिली आहे. या खटल्यात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद बाकी असून ते या आठवड्यात पुर्ण होतील अशी अपेक्षा आहे.
यातील अंतिम सुनावणी 1 डिसेंबरला होणार आहे. त्यानंतरच मोदीच्या संबंधातील निर्णय होणार आहे. नीरव मोदीला 19 मार्च 2019 रोजी लंडनला अटक करण्यात आली असून तेव्हापासून तो कारागृहात आहे.