Congress News – कॉंग्रेस कर्नाटकात जात जनगणना करण्याच्या बाजूने दिसत नाही. अशा स्थितीत प्रदेश कॉंग्रेसच्या या भूमिकेकडे राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधातील बंडखोरी म्हणून पाहायचे का, असा प्रश्न उपस्थित करत भाजपचे राज्यसभा खासदार लहारसिंह सिरोया यांनी कर्नाटकातील जातीय भेदभावाबाबत कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधींवर (Rahul Gandhi) निशाणा साधत लहरसिंह यांनी त्यांना पक्षासाठी ‘पनौती’ (Panauti) म्हटले आहे. लहरसिंह यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक कॉंग्रेसमध्ये जात जनगणनेबाबतची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांसारख्या बड्या नेत्यांच्या विरोधात हे उघड बंड केल्यासारखे आहे.
याचे कारण म्हणजे काही काळापूर्वी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे जातनिहाय जनगणनेची मागणी करत देशभर फिरले होते. अशा कोणत्याही जातनिहाय जनगणनेला पंतप्रधान मोदींसह भाजपाचा विरोध आहे. लहरसिंह पुढे म्हणाले की, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मागणीनुसार जातनिहाय जनगणना आवश्यक असेल, तर कॉंग्रेसने कर्नाटकातही जातनिहाय जगणना घ्यावी.
जर कर्नाटक कॉंग्रेसच्या ज्या नेत्यांना अशी जनगणना नको असेल, अशा नेत्यांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांना बडतर्फ करावे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी असे केले नाही तर ते देशाला मूर्ख बनवत आहेत हे स्पष्ट होते. त्यांनी जनगणनेच्या आधारे जातींमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग बंद करावा.
लहर सिंह म्हणाले की, निवडणूक जिंकावी म्हणून राहुल गांधी जात जनगणनेबद्दल बोलत आहेत. ही मागणी आतापर्यंत त्यांच्या पक्षासाठी रामबाण उपाय ठरली आहे. मात्र, कर्नाटकातील वोक्कलिंगा आणि लिंगायत नेत्यांनी जात जनगणनेला विरोध केला असल्यामुळेच कॉंग्रेस या मुद्यावर कर्नाटकात गप्प आहे.
काय आहे वस्तुस्थिती?
ओबीसी आयोगाने जातजनगणनेची तयारी पूर्ण केली आहे. सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण म्हणजेच कास्ट सेन्सस रिपोर्ट जवळजवळ तयार आहे. मात्र, मुख्यमंत्री सिद्धरामय्या कर्नाटकातील जात जनगणनेचा अहवाल सध्या तरी पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सार्वजनिक करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. या अहवालानुसार, अनुसूचित जाती आणि मुस्लिमांची लोकसंख्या लिंगायत आणि वोक्कलिगांपेक्षा जास्त आहे.
म्हणजे लिंगायत आणि वोक्कलिगांच्या वर्चस्वाबद्दलचा सर्वसामान्यांचा समज संपुष्टात येईल. या दोन जातींच्या दबावामुळे आतापर्यंत एकाही मुख्यमंत्र्याला अहवाल सार्वजनिक करण्याचे धाडस दाखवता आलेले नाही. मात्र आता मुस्लिम आणि अनुसूचित जातींमधून सरकारवर दबाव येत असल्याचे समजते. या अहवालाबाबत सीएम सिद्धरामय्या म्हणाले की, आधी हा अहवाल कॅबिनेटकडे जाईल आणि त्यानंतर तो कधी जाहीर करायचा हे ठरवले जाईल.
कर्नाटकातील जात जनगणनेचा अहवाल कॉंग्रेसने गहाळ केला आहे. कर्नाटक कॉंग्रेसचे सर्व वोक्कलिंग आणि लिंगायत नेते जात जनगणनेची आकडेवारी सार्वजनिक करण्याच्या विरोधात आहेत. जात जनगणनेची आकडेवारी सार्वजनिक करण्याच्या निषेधार्थ कर्नाटक सरकारचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. राहुल गांधी आणि खर्गे जात जनगणनेबाबत गंभीर असतील तर त्यांनी अशा सर्व नेत्यांवर कारवाई करावी
– लहार सिंह सिरोया, भाजपाचे राज्यसभा सदस्य