विशाखापट्टणम :- भारतीय संघाचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक (एनसीए) व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) हे गुरुवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यापासून भारतीय संघाचे बदली प्रशिक्षक म्हणून कार्यरत झाले आहेत. येत्या काळात त्यांच्याच कडे राहुल द्रविड यांचा कार्यभार म्हणजेच मुख्य प्रशिक्षकपदाची धूरा देण्यात येणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
– द्रविड करार वाढवण्यास अनुत्सूक
– एनसीएमध्ये कार्यरत राहण्यात रस
– लक्ष्मण हे आता नवे नवे मुख्य प्रशिक्षक बनणार
– काही दिवसांतच होणार घोषणा
एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा बीसीसीआयशी असलेला करार संपला. द्रविड यांनीच बीसीसीआयला आपला करार न वाढवण्याची विनंती केली असून आपल्याला पुन्हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतच कार्यरत राहायला आवडेल असे सांगितल्यामुळे आता येत्या काळात लक्ष्मण हेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील याचेही संकेत मिळाले आहेत.
द्रविड यांना ज्या मालिकांसाठी विश्रांती दिली गेली होती, त्यावेळी लक्ष्मण हेच भारतीय संघासह बदली प्रशिक्षक म्हणून कार्यरत असायचे. त्यांनीच आता बीसीसीआयशी दीर्घ कालीन करार करण्यास होकार दिल्याचेही सांगण्यात येत आहे.
द्रविड यांचे कुटुंबाला प्राधान्य
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बंगळुरुत आहे तसेच द्रविडही बंगळुरुलाच राहतात. त्यामुळे भारतीय संघाशी दीर्घ करार करण्यापेक्षा कुटुंबालाच जास्त वेळ देता यावा यासाठीच त्यांनी करार वाढवण्यास नकार दिला आहे.
त्याचबरोबर एक खेळाडू म्हणून 20 वर्षे सातत्याने सामने व प्रवास घडल्यामुळे आता मिळालेला वेळ केवळ कुटुंबासाठी व त्यातून वेळ काढून अकादमीत नवोदितांना प्रशिक्षण देण्यात रस असल्याचे द्रविडने बीसीसीआयला कळवले आहे.