मुंबई – महिलांविषयी वादग्रस्त विधान करण्याची जणू राजकीय वर्तुळात स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपच्या आयटीसेल प्रभारी जितेन गजारिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे मोठा वाद झाला होता. आता या वादावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत त्या विधानाचं समर्थन केलं आहे.
जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्यासंदर्भात ट्विट करताना त्यांना ‘महाराष्ट्राची राबडी देवी’ असे म्हटलं होतं. यावरून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवत सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी जितेन गजारिया यांना नोटीस पाठवत जबाब नोंदवून घेतला. दरम्यान हे ट्विट नंतर जितेन गजारिया यांनी डिलीट केलं.
यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. माझा तो बळवंतराव दुसऱ्यांचा तो बाब्या, असं महाविकास आघाडी सरकारचं सुरू आहे. सरकारमधील मंत्र्यांनी आणि नेत्यांनी महिलांबद्दल काहीही बोलायचं ते चालतं, पंतप्रधानांवर टीका करायची. पण भाजपामधील मंत्र्यांनी एक शब्द जरी बोलला तरी त्यांच्यावर कारवाई होते.
दरम्यान जितेन गजारिया यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना राबडीदेवी म्हटलं होतं, फूलन देवी नाही, तरी गजरिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, राबडीदेवी शिवी नाही” असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी गजारिया यांचं समर्थन केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावर अद्याप शिवसेनेकडून प्रतिक्रिया आलेली नाही.