भोर – भोर तालुक्यात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून प्रशासन प्रयत्न करत असतानाही (दि. 14) रोजी भोरमध्ये एक करोना बाधित रुग्ण आढळून आला. त्याच्या संपर्कात असलेल्या त्याच्या कुटुंबातील नेरे (ता. भोर) येथील 9 जणांना तपासणीसाठी पुणे येथे त्याच दिवशी रात्री पाठवण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.
मात्र, (दि. 15) ला नेरे येथील 11 जण आणि सारोळा येथील 10 जण त्याच्या संपर्कात आल्याने तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते. या 19 जणांपैकी नेरे येथील एका मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, उर्वरीत लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, 29 जणांना प्रशासनाने होम क्वारंटाइन केले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी दिली आहे.
या आरोग्य तपासणीसाठी भोर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील 714 शिक्षकांपैकी 434 शिक्षक काम करत असून, 270 शिक्षक हे बाहेरगांवी आहेत, तर तालुक्यातील 584 शिक्षकांपैकी 150 शिक्षकांना 25 तपासणी नाक्यांवर नियुक्त केले आहे.
आरोग्य तपासणीचे काम येत्या 3 ते 4 दिवसांत पूर्ण करून तसा अहवाल उपविभागीय अधिकारी व तहसीलदार अजित पाटील यांना देण्यात येणार असल्याचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी स्पष्ट केले.