पुणे: पीएमपी ग्रुप पुणे यांच्या वतीने आयोजित एचकेसी 14 वर्षांखालील करंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत सुफीयान सय्यदने केलेल्या उपयुक्त 42 धावांसह प्रणित आठवले (4-24) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने व्हेरॉक वेंगसकर क्रिकेट अकादमी संघाचा 110 धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले.
अंतिम फेरीच्या लढतीत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाला 48.2 षटकात 152 धावाच करता आल्या. यात सुफीयान सय्यद 42, आर्य पानसे 36, साईराज चोरगे 26, अर्चित गायकवाड 25 यांनी महत्त्वपूर्ण खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला. व्हेरॉककडून सुश्रुत सावंत (5-10), अविष्कार दिंडे (3-30), तनिष्क खेडकर (1-38) यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत पीवायसीला 152 धावांवर रोखले.
या आव्हानाचा पाठलाग पीवायसीच्या प्रणित आठवले (4-24), निखिल लुनावत (2-12), अर्चित गायकवाड (1-2) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा डाव 16.4 षटकात अवघ्या 42 धावावर संपुष्टात आला. यात सुश्रुत सावंतने 22 धावा करून थोडासा प्रतिकार केला. सामन्याचा मानकरी प्रणित आठवले ठरला. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली.