नाशिक रेल्वे प्रकल्पाला गती
पुणे – पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी आवश्यक भूसंपादन निधीची वाट न पाहता त्वरित सुरू करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पुण्यातील हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या चार तालुक्यांतून रेल्वेमार्गासाठी 575 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांशी थेट वाटाघाटी करून जमिनी खरेदी करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले.
पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतील सुमारे 1 हजार 470 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. भूसंपादनासंदर्भात रेल्वे विभागाकडून हवेलीमधून सहा प्रस्ताव दाखल झाले आहेत. या 575 हेक्टर जमिनीसाठी 1300 ते 1500 कोटी रुपयांचा थेट वाटाघाटीने जमीन खरेदी निधी लागणार आहे. परंतु रेल्वेकडून अद्याप कोणताही निधी मिळालेला नाही. हा निधी त्वरीत उपलब्ध करून देण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून जमिनीची खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी कागदपत्रांची तपासणी, मोजणी करण्याच्या सूचना भूमि अभिलेख विभागाला देण्यात आल्या आहेत.
पुरंदर विमानतळ मोबदला : शुक्रवारी बैठक
पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित “छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळा’साठी भूसंपादन आणि मोबदला देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी येत्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.